गुढीपाडवा, पंचांग पूजन
- Onkar Date
- Mar 27
- 4 min read

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो. गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दसरा, दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्तांचे शुभदिवस आहेत. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. नूतन संवत्सराची सुरुवात करणारा म्हणून चैत्र शुध्द प्रतिपदेचा दिवस हा एक महत्वाचा शुभदिवस मानला जातो. आपल्याकडे प्रत्येक संवत्सराला (वर्षाला) नाव दिलेले असते. इतर कोणत्याही कालगणनेत अशाप्रकारे वर्षाला नाव दिलेले दिसत नाही. नवीन शके १९४७ या संवत्सराचे नाव विश्वावसु संवत्सर असे आहे. साठ संवत्सरांचे (वर्षांचे) एक चक्र आहे. ती साठ नावे पुन्हा पुन्हा चक्रगतीप्रमाणे येत असतात.
खगोलीय महत्त्व
चैत्र महिन्यात भारतीय नूतन वर्षाचा प्रारंभ होतो. याच्याही पाठीमागे काही गणितीय सिद्धांत आहेत. राशीचक्राची सुरुवात मेष राशीपासून होते. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. म्हणून चैत्र हा वर्षातील पहिला महिना आहे. चैत्र महिन्यात पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. म्हणून त्या नक्षत्रावरून चैत्र हे नाव पडले आहे. तेव्हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षारंभाचा सुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसार देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
ऐतिहासिक महत्त्व
शालीवाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते त्याबाबतची कथा अनेक वर्षांपासून सांगितली जाते शालीवाहन नावाचा कुंभाराचा मुलगा होता त्याने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून त्या सैन्याला सजीव केले, या सैन्याच्या मदतीने शत्रूचा पराभव केला या कथेचा लाक्षणिक अर्थ असा घेतला जातो की, दगड-माती प्रमाणे चेतनाहीन, पौरुषहीन बनलेल्या त्या काळातील लोकांमध्ये शालीवाहनाने चैतन्याचा मंत्र भरला, उत्साहाने प्रेरीत झालेल्या त्या सैन्याने मर्दुमकी गाजवली शत्रूवर विजय मिळविला. सद्विचार, वीरश्री यासारखे गुण आपल्यातच असले तरी काही वेळा त्यांना प्रेरीत करावे लागते हे काम शालीवाहनाने केले. शालीवाहनाने हुणांवर विजय मिळविलेला हा दिवस. सर्वसामान्य जनतेला हाताशी धरून केलेल्या या युद्धामध्ये मिळवलेल्या विजयानंतर लोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि या दिवसापासून शालीवाहन शकाची सुरुवात झाली असल्याने एक ऐतिहासिक महत्व या गुढीपाडव्याला आहे. तसेच रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येमध्ये दाखल झाले. त्यांचे स्वागत गुढ्या, तोरणे उभे करुन केले गेले. गुढी उभी करणे हे विजयाचे, आनंदाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते.
नैसर्गिक महत्त्व
नवीन वर्ष सुरु होताना त्याला ऐतिहासिक, नैसर्गिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्व असले पाहिजे. तसे या चैत्रापासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षात वसंतऋतूचे आगमन झालेले असल्याने उत्साहाचे असे नैसर्गिक वातावरण तयार झालेले असते. सणांचा आणि ऋतूंचा संबंध हा एकमेकांना पूरक असतो. म्हणून पुढे येणाऱ्या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून या दिवसापासून कडुनिंबाचा वेगवेगळ्या पध्दतीने वापर करण्यास सांगितले आहे. कडूनिंबामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे उन्हाळ्यापासून होणाऱ्या उष्णतेच्या विकारांचा त्रास कमी होतो.
पंचांगाचे महत्त्व
संपूर्ण जगावर परिणाम करणारे सूर्य आणि चंद्र यांच्या गणितावर आधारित असलेली कालगणना पंचांगामुळे आपणास समजू शकते म्हणून या दिवशी गुढीपूजनानंतर पंचांगाचे देखील पूजन केले जाते. सूर्याचा व चंद्राचा योग घडत असल्यामुळे तिथी, वार आदींवर आधारित चैत्र ते फाल्गुन या बारा महिन्यांची रचना करण्यात आलेली आहे. काही धर्मामध्ये केवळ सूर्याचाच विचार करुन वर्षमान ठरविले जाते. तर काही धर्मामधून केवळ चंद्राचाच विचार करुन वर्षमान ठरविले जाते. मात्र चैत्र ते फाल्गुन या वर्षमानासाठी सूर्य आणि चंद्र या दोघांचाही विचार केल्याने निसर्गाचा समतोल कालगणनेशी साधला जातो.
चैत्र शुध्द प्रतिपदा सूर्योदयाला ज्या दिवशी असेल तो नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढया उभ्या करुन, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणून संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहात असल्यास आपल्या घरी ही पूजा करुन गुढी उभी करण्यास काहीच हरकत नाही. त्याकरिता असे कोणतेच बंधनही नाही. त्यामुळे गुढीपूजन, पंचांगपूजन अवश्य करावे.
गुढी कधी आणि कशी उभी करावी ?
गुढी पूजनाकरिता कोणताही विधी नाही. गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल तर सर्व करता येते. गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करुन रांगोळी काढावी. अंघोळ करुन त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
ब्रह्मध्वज नमस्तेSस्तु सर्वाभिष्ट फलप्रद ।
प्राप्तेSस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ।।
ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे. त्यानंतर वर्षभरातील महत्वाच्या घटना पिक-पाणी यांची माहिती करुन घ्यावी. सूर्योदयानंतर सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताचे सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी. गुढीपूजनासाठी कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते तसेच कोणतेही कुयोग वर्ज्य नाहीत.
शके १९४७, विश्वावसु संवत्सराविषयी काही -
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एकूण 3 गुरुपुष्यामृत योग आहेत. यावर्षी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर आणि फाल्गुन पौर्णिमा म्हणजे 3 मार्च 2026 अशी दोन चंद्रग्रहणे भारतात दिसणार आहेत. यावर्षी 13 जून ते 6 जुलै गुरुचा अस्त असून 14 डिसेंबर ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत शुक्राचा अस्त आहे. शनि संपूर्ण वर्ष मीन राशीत असणार असून कुंभ, मीन आणि मेष या राशींना साडेसाती आहे. या वर्षी श्रावण महिन्यात 12 ऑगस्ट रोजी आणि पौष महिन्यात 6 जानेवारी रोजी अंगारक चतुर्थीचा योग आहे. यावर्षी केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे 4 जून पर्यंत होईल असे दिसते. महाराष्ट्रात 16 जून पासून मान्सूनची सुरुवात होईल. विशेषतः जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस समाधानकारक होईल. मागच्यावर्षी पेक्षा पर्जन्यमान कमी असेल असे दिसते.
या वर्षातील काही प्रमुख दिवस –
गुढीपाडवा – 30 मार्च, रविवार
अक्षय्य तृतीया – 30 एप्रिल, बुधवार
आषाढी एकादशी – 6 जुलै, रविवार
गणेशोत्सव – 27 ऑगस्ट, बुधवार ते 6 सप्टेंबर, शनिवार
घटस्थापना – 22 सप्टेंबर, सोमवार
दसरा – 2 ऑक्टोबर, गुरुवार
नरक चतुर्दशी – 20 ऑक्टोबर, सोमवार
लक्ष्मीपूजन – 21 ऑक्टोबर, मंगळवार
दिवाळी पाडवा – 22 ऑक्टोबर, बुधवार
भाऊबीज – 23 ऑक्टोबर, गुरुवार
कार्तिकी एकादशी – 2 नोव्हेंबर, रविवार
दत्तजयंती – 4 डिसेंबर, गुरुवार
मकर संक्रांति – 14 जानेवारी, बुधवार
महाशिवरात्रि – 15 फेब्रुवारी, रविवार
साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आणि नववर्षाचा आरंभ दिन म्हणून गुढीपाडव्याचे महत्व अबाधित राहणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा पाडव्याचा मुहूर्त आणि गुढीपाडव्यापासून सुरू होणारे नवीन संवत्सर सुखाचे जावो !
Comments