संकष्ट चतुर्थी, 17 मार्च 2025
- Onkar Date
- Feb 15
- 2 min read
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. सायंकाळी गणेशाची पूजा करून रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशास नैवेद्य दाखवून उपवास सोडतात.
संकष्ट चतुर्थी निमित्त आपण गणेशाच्या विविध नावांपैकी काही नावांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...

विश्वकर्ता विश्वमुखो विश्वरूपो निधिघृणिः । कविः कवीनामृषभो ब्रह्मण्यो ब्रह्मणस्पतिः ।
विश्वकर्ता - अनंतकोटी ब्रह्मांडांचे निर्माते.
विश्वमुख - मुख शब्दाचा अर्थ आरंभ, या विश्वरूप उतरंडीचा आरंभ ज्यांच्यापासून होतो ते विश्वमुख किंवा हे विश्व ज्यांच्या मुखात अर्थात ताब्यात आहे ते विश्वमुख.
विश्वरूप - रूप शब्दाचा अर्थ आकार. दिसणे. हे विश्व हा ज्यांचा आकार आहे. अर्थात ज्यांचे दृश्यरूप हे जगत् आहे. या जगताच्या रूपात जे सगुण साकार सावयव झाले ते विश्वरूप.
निधी - शास्त्रकारांनी हय (घोडा) गज रथ दुर्ग (किल्ला भवन) भांडार (धनसंपदा) अग्नी, रत्न, धान्य तथा प्रमदा (सुयोग्य स्त्री) या नऊ बाबींना निधी अर्थात संपत्ती म्हटले आहे. या सर्व भौतिक वैभवाच्या बाबी श्रीगणेशचरणी लीन असतात. अतः ते निधी. त्याचप्रमाणे कामधेनु, दिव्यअंजन, सिद्धपादुका, अन्नपूर्णा, कल्पवृक्ष, चिंतामणीरत्न, घुटिका, कलक तथा परीस या नऊ चमत्कृतीपूर्ण बाबींनाही नवनिधी म्हणतात. याही गणराजांच्याच अधिपत्याखाली असतात या अर्थानेही निधी.
घृणी - घृ शब्दाचा अर्थ आहे प्रकाशणे. घृणीचा अर्थ प्रकाशित. समस्त तेजाच्या अंतर्भागी विद्यमान आत्मचैतन्यरूप श्रीगणराज या अर्थाने घृणी असतात. स्वयंप्रकाशित तथा इतरांना प्रकाशित करणारे ते घृणी.
कवि - कवी शब्दाचा अर्थ आहे रचयिता. आपल्याला हवी तशी रचना शब्दकार करतात. अतः त्यांना व्यवहारात आपण कवी म्हणतो. त्यानुसार या अनंतकोटी ब्रह्मांडांची हवी तशी रचना करतात. अतः श्रीप्रभू कवी म्हणविले जातात.
कवीनाम् ऋषभ - ऋषभ शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ, सर्व कवींमध्ये श्रेष्ठ ते कवीनाम् ऋषभ, व्यावहारिक कवी मर्यादित शाब्दिकविश्व निर्मितो श्रीगणनाथ या अनंतविश्वाचे निर्मात आहेत अतः ते कवीनाम् ऋषभ आहेत.
ब्रह्मण्य - ब्रह्मतत्वाशी संबंधित ते ब्रह्मण्य, साध्या शब्दात वेदवाङ्मय, श्रुति, शास्त्रग्रंथ. ते सगळे ज्ञानरूप असल्याने आणि ज्ञान हा गणराजांच्या स्वरूपाचा भाग असल्याने या सगळ्या रूपात तेच नटले आहेत अतः ते ब्रह्मण्य.
ब्रह्मणस्पति - समस्त ब्रह्मांचे पती. ब्रह्म म्हटल्यावर ते एकच. पण शास्त्रात अध्ययन सुलभतेसाठी विविध ब्रह्मांचे वर्णन आहे. अन्नब्रह्म, प्राणब्रह्म, मनोब्रह्म, आनंदब्रह्म इ. त्याच प्रमाणे शक्ती, सूर्य, विष्णू आणि शंकर यांना अनुक्रमे असत् ब्रह्म, सत्ब्रह्म, समब्रह्म आणि नेतिब्रह्म म्हणतात. (व्यापक विवेचनासाठी पहा श्रीमुद्गलमहापुराण प्रथमखंड पृष्ठ ६८) या सगळ्यांनाच ब्रह्म म्हणतात. मात्र या सगळ्यांना ज्यांची सत्ता चालविते त्या श्रीगणेशांस ब्रह्मणस्पति म्हणतात.
(संदर्भ - श्रीगणेश सहस्रनाम, विद्यावाचस्पति प्रा. स्वानंद गजानन पुंड)
काही प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा खालील प्रमाणे
17 मार्च 2025, रविवार - मुंबई चंद्रोदय २१:२०
अकोला - २१:०५ | जबलपूर - २०:५६ | पुणे - २१:१५ | रांजणगांव - २१:१४ |
अमरावती - २१:०२ | जळगांव - २१:११ | पुळे - २१:१६ | लातूर - २१:०४ |
अलिबाग - २१:१९ | जालना - २१:०८ | बीड - २१:०८ | वडोदरा - २१:२३ |
अहमदनगर - २१:१२ | ठाणे - २१:२० | बीदर - २०:५९ | वर्धा - २०:५८ |
अहमदाबाद - २१:२६ | धारवाड - २१:०६ | बुलढाणा - २१:०८ | विजयपूर - २१:०५ |
इंदूर - २१:१२ | धाराशिव - २१:०५ | बेंगळूरु - २०:५२ | वेंगुर्ले - २१:१२ |
ओझर - २१:१८ | धुळे - २१:१४ | बेळगांवी - २१:०९ | छ.संभाजीनगर - २१:११ |
कलबुर्गि - २१:०१ | नांदेड - २१:०१ | भंडारा - २०:५४ | सांगली - २१:१० |
कल्याण - २१:१९ | नागपूर - २०:५६ | भुसावळ - २१:१० | सातारा - २१:१३ |
कारवार - २१:०९ | नाशिक - २१:१७ | भोपाळ - २१:०७ | सावंतवाडी - २१:१२ |
कोल्हापूर - २१:११ | पंढरपूर - २१:०८ | महड - २१:१८ | सिद्धटेक - २१:११ |
गदग - २१:०४ | पणजी - २१:११ | मोरगाव - २१:१२ | सोलापूर - २१:०५ |
गोकर्ण - २१:०८ | परभणी - २१:०४ | यवतमाळ - २१:०० | हुब्बळ्ळी - २१:०६ |
ग्वाल्हेर - २१:०८ | पाली - २१:१८ | रत्नागिरी - २१:१५ |
Comentários